नको तेव्हा नको तिथे
शाळेतले शिक्षक गेले, एखाद्या नेत्याची हत्या झाली की शाळेला सुटी मिळते.. ही आनंदाची घटना नाहीच पण तेव्हा सुटी मिळाली म्हणून काही मुलांच्या ओठावर हसू असते ! कॊलेजात सर्व मैत्रिणी ट्रेडिशनल डे म्हणून साडी नेसतात तेव्हा सुद्धा जीन्स घातलेली एखादी असतेच ना! सर्व भारतीय हाताने जेवत असतांना एखादा मित्र अगदी पापड सुद्धा काट्य़ाचमच्याने खातो असे अनुभवले आहे का? सर्वजण काटा चमचा वापरत असतांना त्याच टेबलावर हाताने जेवणारा मित्रसुद्धा विरळाच! प्रत्येकवेळी प्रवाहाविरुद्ध वागणारे वेगळे. अनेककदा अनवधानाने असे नको तेव्हा नको तसे वागणारे लोक असतात. लहान मुलांचा हात यात कुणी धरू शकणार नाही. पण अशा वागण्या बोलण्यामुळे नेहमीचे आयुष्य ’जिवंत होत” असे मला वाटते.
आजकाल अनेक घरांमधे बाथरूम बरीच मोठी असते, सजवलेली असते आणि अनेक घरात त्यात पुस्तकांचा रॆक असतो. काही शोभेच्या वस्तू असतात. परत सगळ एवढ चकाचक की आपण लहान असतांनाच्या आपल्या भारतातल्या घरातल्या , चाळीतल्या बाथरूमच्या सर्व कल्पना जुन्या आणि कालबाह्य ठरतील. आमचा एक मित्र रेस्टरुममधे चहा पितो असे मी ऐकले होते. फोनवर बोलणारे, इमेल बघणारे लोक मला माहिती होते. पण चहा पिणे म्हणजे जरा जास्त असे मला अजूनही वाटते. तरीसुद्धा माझ्या घरात पुस्तकपेन , लॆपटॊप इत्यादी गोष्टी बाथरूममधे गेल्या. दोन्ही मुलांचे पॊटी ट्रेनिंग ही महत्त्वाची घटना त्याला कारणीभूत होती. असेच एकदा मराठी बालगीते कानावर आली आणि मी दचकलेच! मुलगी बाथरूममधे होती. दीड पावणेदोन वर्षाच्या मुलीचा डायपर सोडवण्याचा म्हणजेच पॉटीट्रेन करण्याचा माझा प्रयत्न जोरात सुरू होता. त्यावेळी जे हवे ते घे, पण तुला या मोठ्या बाथरूमबाहेर जाऊ देणार नाही असा माझा पावित्रा असायचा. त्यामुळे तिची खेळणी, क्रेयॊन, कलर्स, खडू, सिडी प्लेयर असा सर्व जामानिमा अखेर मी तिथेच नेला होता. तिला तिच्या छोट्या पॊटीवर बसवून मी कधी पुस्तकातली गोष्ट सुद्धा सांगितलेली होती. इथेच सगळा घोटाळा झाला होता. पॊटीवर मुलगी चक्क गाणी म्हणत बसली होती. महिन्याच्या आत मुलगी ट्रेन झाली आणि मला हुश्श झाले. मी कोणतेही खेळणे, सिडी प्लेअर इत्यादी मुलाला ट्रेन करत असतांना बाथरूममधे नेले नाही. आधीचा अनुभव गाठीशी होता करणार काय... पण तेवढ्याने काही फरक पडला नाही. मुलाने बाथरूममधे टीश्य़ू पेपरचा रोल उलगडणे, ट्रेश मधे टाकणे, सगळा रोल पॊटीत टाकणे असे उद्योग सुरू केले. शेवटी सर्व वेळ त्याच्या शेजारी थांबून आणि त्याला बोलण्यात गुंगवण्याचा मी प्रयत्न केला. मग सुरु झाल्या गोष्टी, गप्पा आणि गांणी.. कमरेला नुसती चिंधी असली तरी तेवढी त्याला पुरायची. पॆन्ट, चड्डी किंवा डायपर काही असो पण काही तरी गुंडाळलेले आहे ना इतकेच त्याला बाथरूमकडे न जाण्याकरता पुरत असे.
घरातली इतर कामे करता करता मी मुलगा काय करतो आहे याचा अंदाज घेत असायचे. नेमक्या वेळी त्याला बाथरूममधे घेऊन जायचे. अगदी घड्याळ बघून तासादोन तासाने न्यायचा प्रयोग पण झाला. शेवटी त्याच्या चार छोट्या गाड्या बाथरूममधे ठेवल्या. तुला ही गाडी हवी असेल तर जा असे कर तसे कर असे अमीष दाखवले आणि नंतर कधीतरी ट्रेनिंग संपले.
दोन वर्षाचे होईपर्यंत माझी मुले फक्त मराठी बोलायची. पण नंतर शाळेत जाऊ लागली तसे इंग्रजी आले. ..आले म्हणजे काय चांगलेच बस्तान बसले. मुले एखादा श्लोक म्हणायची पण म्हण म्हटले की म्हणतील असे नाही. तेच गणपतीची आरती , देवीची आरती या सर्वांचे..भारतात माझी आजी रेडियोवर अभंगवाणी लावयाची आणि नातवंडांना अभंग पाठ व्हायचे. तशा इथे मीच आरत्या म्हणणे सुरू केले. एक दिवस सकाळची वेळ होती. मुलाने थेट पॊटीवरून आरती म्हणायला सुरु केली! काय बोलणार? नको म्हणू म्हटले तरी पंचाईत आणि म्हणू द्यावे तरी मनाला पटेना. आरती संपल्यावर आरती केव्हा आणि कुठे बसून म्हणायची ते सांगितले शेवटी.. मुलाने ऐकून घेतले आणि सांगितले आबा तर आंघोळ झाल्यावर बाथरूममधे असतांनाच स्तोत्र म्हणतो, पॊटी शेजारी..
गाणे म्हण असे सांगितल्यावर गाणे म्हणणे असे आज्ञाधारक वागणे त्यांच्या स्वभावात नसावे किंबहुना नव्हतेच. काही कर म्हटले की एखादी स्प्रींग असल्याप्रमाणे का”? हा प्रश्न आलाच पाहिजे. म्हणूनच मुले कोणासमोर काही शिकवलेले करुन दाखवतील याचा नेम नसायचाच. म्हण म्हटले की म्हणायचे नाही एवढेच त्यांचे समीकरण पक्के होते. म्हणू नको म्हटले की ते ऐकतील याची खात्री मात्र नाही! शाळेतही प्रश्न सोपा वाटला मग कशाला उत्तर लिहायचे असे उत्तर मी मुलीकडून ऐकले आहे.
जशी चार पाच वर्षाची झाली तशी मुलगी झोपेत मराठीत बोलण्याऐवजी इंग्रजी बोलू लागली. मुलामधे तीन वर्षाचे असतांनाच हा बदल जाणवला. पण अमेरिकेत दुकानात, मॊलमधे, विमानतळावर असतांना तुम्हाला जे काही विचारायच आहे ते इतरांना कळू नये असे असेल तर मराठीत विचारत जा , उगीच तुमची शेरेबाजी नको कळायला इतरांना असे मी म्हणत असते. त्यामुळे साधारणपण सावर्जनिक ठिकाणी मुले प्रश्न विचारतात/ माझ्याशी मराठी बोलतात. गेल्या भारतभेटीत आम्ही एका मित्राकरता लॆपटॊप घेऊन जात होतो.
मुंबईत कस्टम अधिकायाने विचारले ,’ हा लॆपटॊप तुमचा आहे का”?
'हो '
तेवढ्यात मुलीने मराठीत उत्तर दिले,’ काकाचा आहे असे का म्हणालीस मी वापरते म्हणाले तर मग ?’तिचे वेगवान अमेरिकन मराठी त्याला कळायच्या आत ’ काकाचा म्हणजे आमच्या एका मित्राकडे पण हेच मॊडेल आह” अशी सारवासारव त्यावेळी करावी लागली.
खर बोलाव पण जर समोरचा दुखावत असेल तर नको बोलू खर असे अतिशय क्लिष्ट सल्ले आपण मुलांना देत असतो. . माझी मुलगी एका वाढदिवसाला गेली होती. तिथे असणारा केक तिला आवडला नाही म्हणून तिने संपवला नाही. कारण विचारल्यावर तिने बिनधास्त नाही आवडला असे सांगितले. इतकेच नाही तर ’आई तू खा म्हणजे वाया गेला असे तुला वाटणार नाही” ही टिप्पणी सुद्धा केली. सुदैवाने तो विकत आणलेला केक होता म्हणून बरे नाही तर तिच्या मैत्रिणीच्या आईचा चेहरा बघण्यासारखा झाला असता. भारतीय आई, तिने केलेला पदार्थ आणि ही चांगला झाला नाही म्हणते आणि खात नाही म्ह्णजे संपलेच सगळे:) आपल्यासमोर आपण केलेल्या पदार्थांना नावे ठेवणारी मुले तोच पदार्थ शेजारी मिटक्या मारत खातात. कधी वर माझ्याच आईने केले तेच चांगले असे मित्राच्या आईला तोंडावर सांगतात. त्याउलट आपल्या घरी आले की इतरांच्या ड्ब्यातल्या पदार्थाचे कौतुक करतात.
अमेरिकेतील भारतीय मुलांची इतर मुलांमधे सामावले जावे म्हणून धडपड सुरु असते. चायनीज , कोरियन, स्पॆनिश याला अपवाद नाहीत. वर्गातले चिडवणे, मित्रमैत्रिणी त्यांचा स्वभाव अशी अनेक कारणे त्यामागे असतील. अर्थात समाजात राहून इतरांसारखे वागावेसे वाटणे , त्या समाजाचा एक घटक व्हावे असे वाटणे हे साहाजिक आहे. बाहेर एखादा स्वेटर लागेल एवढी थंडी असतांना मी अनेक मुली बिनबाह्यांचा शर्ट किंवा ड्रेस घालून आल्या आहेत असे बघते. इतर भारतीय मुली सुद्धा तसेच करत असतात. माझी मुलगी सुद्धा मधेमधे तसा प्रयत्न करून पाहते. त्यावेळी तिला विचारते की उन्हाळ्यात काय करशील? ह्या मुली ऐन उन्हाळ्यात आणखी किती कपडे कमी करतील? का मध्येच लक्ष वेधून घेण्याकरता ,मुद्दाम उठून दिसावे म्हणून अंगभर कपडा घालतील असा विचार डोकावतो.
समाजात वावरतांना नकळत प्लीज, थॆक्यू तोंडात येते. मुलांनी एखादे काम चटकन केले की सुद्धा थॆक्यू म्हणते मी. पण घरात असले की प्रत्येकवेळी एखादी वस्तू मागतांना त्यांनी प्लीज म्हणावे असे मला वाटत नाही, अनेकदा त्यांचा टॊन कसा आहे, प्रश्नाचा रोख कसा आहे ते सुद्धा मला महत्त्वाचे वाटते. ते सर्व ठीक असेल तर मी तसा प्लीजचा आग्रह करत नाही. पण मग आई बाबा एकमेकांशी बोलतांना प्लीज थॆक्स करत नाही हे मुलांना दिसत असतेच. कधीतरी रागावून त्यांना म्हटले असे विचारायचे असते का तेव्हा लगेच उत्तर येते, "तू कुठे म्हणतेस? "
बाहेर सुद्धा मग कधीतरी ही मुले प्लीज थॆक्स विसरले की सरळ उत्तर देतात आम्ही कुठे घरी असे सारखे म्हणतो..
एखाद्या नॊन व्हेज खाणाया व्यक्तीला सारखे नॉन व्हेज खाणे चांगले नाही असे तिच्या तोंडावर काही सांगायचे नाही, ते तिला आवडणार नाही असे मी मुलीला सांगत होते. तू दुसरा विषय शोधून त्यावरच बोलत जा . 'त्यावर मुलगी म्हणते,' आई एखादी गोष्ट जर एका व्यक्तीकरता चांगली नाही तर ती इतरांकरता कशी असेल?ती माझी मैत्रिण आहे ..तिला मी हे सांगणारच. तूच तर म्हणतेस खरे बोलत जा! '
मुलीने आतापासूनच मेकअप करू नये म्हणून मेकअप न करण्याकडे माझा कल असतो. ही रंगरंगोटी शेवटी कृत्रिम आहे आणि त्वचेला त्याने त्रासच होते असे माझे म्हणणे असते. मुलीचा कथकचा कार्यक्रम असेल तेव्हाच तिला मेकअप करता येतो. माझा मुलगा तेव्हा सारे कुतूहलाने बघत असतो. आमचे बोलणे ऐकत असतो. असाच एकदा मेकअप करण्यावरून वाद झाला होता. नेहमी मेकअप न करणारी माझी अमेरिकन शेजारीण त्या दिवशी आमच्याकडे आली ते जोरदार मेकअप करून!. तिची खर अपेक्षा असावी मी काहीतरी बोलेन अशी. सुदैवाने मुलगी गप्प होती पण मुलगा तिला म्हणाला,’ तू लिपस्टीक लावलेस का?’ कुणीतरी नोंद घेतली याचा आनंद तिच्या चेहयावर होता. तिने का मेक अप केला यावर ती भरभरून बोलली.
मुलगा तिला म्हणाला,’ तू लिपस्टिक काढ , लावू नकोस तुला बाऊ होईल!”
अशाप्रकारे मुलांना खरे बोलण्याचा उमाळा, प्रामाणिकपणाचे भरते नको तेव्हा आले नाही तरच नवल!
कधीतरी वेडीवाकडी तोंडे करणे, डोळे तिरळे करणे,चित्रविचित्र आवाज काढून मुलांना खेळवण्याची अनेक पालकांची सवय असते. थोडा विरंगुळा, थोडी मजा असा जरी त्यांचा हेतू असला तरी मुलांना भलताच इशारा मिळतो. जो पालकांच्या गावीही नसतो. मुले सुद्धा मग मुद्दाम असे गंमतशीर वागायला लागतात. घटाघटा आवाज करत पाणी पिणे, मोठ्याने खोट्या ढेकरा देणे , जीभ वेडावणे हे प्रकार करतांना मुलांना पाहिले आहे का? आपल्या पालकांच्या उपस्थितीत जेव्हा ती अशा काही गमती करतात, वर पालकांचे नाव घेतात तेव्हा तर पालकांचा चेहरा अगदी बघण्यासारखा असतो.
वागण्याबोलण्यात असलेले अंतर मुलांना चटकन कळते. पण रोजच्या जगण्यात दांभिकपणा, विसंगती किती ठासून भरलेली असते. मित्रमंडळी नात्यागोत्यातली मंडळी अशा कोणावरही टीका अथवा गॊसिप न करणेच बरे. आईवडील नावे न घेता बोलले तरी त्यांना अशावेळी नेमके सगळे संदर्भ लागतात. डायनोसॉर किती वर्षांपूवी अस्तित्त्वात होते, चंद्रावर प्रथम कोण गेले, भारतात किती भाषा आहेत हे तर सोडाच पण अमेरिकन आयडॉल कोण होईल किंवा आयकार्ली सुटीत काय करणार आहे या प्रश्नांचेही त्यांना कुतूहल वाटले नसेल एवढी जिज्ञासा अशा नको त्या वेळी मुलांच्या मनात अचानक जागृत होते. असे संकटात टाकणारे वागणे काय एकतर्फी असते का? जशी मुले मोठी होतात, त्यांचे विश्व तयार होते तेव्हा पालकांचे वागणे त्यांना विचित्र वाटू लागते. सल्ले देण्याची दिशा बदलली आहे असे जाणवते. कधी कधी ही वाहतूक वेगाने आणि दुतर्फा चालू असते तेव्हा तर विचारायलाच नको. मुले टीनएजर असण्याचा हा काळ अवघड असतो दोघांकरताही! कालांतराने मुले आणखी मोठी होतात. त्यांची लग्ने ठरतात, होतात, ते आईबाप होतात.. तेव्हा ही दिशा उलट होते. मुले ऐकत नाहीत,मुले चुकीचे वागतात, याची जागा मग माझ्या आई वडिलांना काहीच कळत नाही याने घेतलेली असते. पालकांना कळले नसते तर तुला अक्कल कशी आली हा प्रश्न विचारून फायदा नाही... ही फक्त गंमत असते आणि ती अनुभवण्यात असते खरी मजा.
पोस्ट खूपच आवडली.मुलं आणि पालक याबद्दल अचूक आणि तरीही सविस्तर छान लिहिलंय तुम्ही! खरं तर मला तुमचाच जबरी हा शब्द वापरायचा मोह होतोय.खरंच अप्रतिम झालंय.समानधर्मी भेटला की मस्त वाटतं तसं वाटतंय.माझ्या ’मनू आणि मी’ वरच्या तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक आभार.शुभेच्छा!
ReplyDeleteपोस्ट खूप आवडली...majha mulga aata don warshancha aahe mhanaje pudhe ithech rahila tar (ani nahi tarihi) kai hou shakel hyachi jhalak aahe mast....:)
ReplyDelete