आता कशाचा रिकॊल करणार?
काही ग्राहक तक्रार नोंदवतात,कधी निर्मात्यावर खटला भरतात, नुकसानभरपाई मागतात आणि मग निर्माता आमचा माल खराब आहे , त्यात काही दोष आहेत हे मान्य करतो आणि सर्व ग्राहकांकडून माल परत घेतो, त्या सर्वांना त्याचा मोबदला देतो; आणि हे अनेकदा घडते . उत्पादकाचे हे असे वागणे कधी काळी मला मला अशक्य कोटीतले वाटत असे. भारतात होते तेव्हा ग्राहक चळवळ अस्तित्त्वात असली तरी तिची ताकद आणि मर्यादा मला चांगल्याच ठाऊक होत्या. आता कदाचित काळच बदलला आहे त्यामुळे भारतातही ग्राहकांची स्थिती बरी झाली असावी. पण मी जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा मुलांच्या खेळण्यात काही त्रुटी आहे म्हणून ती खेळणी वापरू नका, दुकानात परत करा असे बरेचदा कानावर आले होते. त्यावेळी आश्चर्य वाटले होते. सदोष वस्तू परत घेणे, बदलून देणे अथवा मोबदला देणे अशी ही रिकॊल प्रक्रिय़ा असते. कायद्यानुसार अनेक वस्तूंना ती लागू होऊ शकते. बरेच वेळा कंपन्या यातून सहीसलामत सुटण्याचा मार्ग आधीच शोधून ठेवत असतात. पुढे काही काळानंतर रिकॊल प्रक्रीयेत आम्ही सहभागी झालो होतो... मी मुलीकरता वापरत असलेली कार सीट त्या कंपनीने रिकॊल केली होती. काही बरे वाईट झाले असते तर .. या विचाराने मी सुन्न झाले होते. एक दोन वर्षांनी बाहुल्यांचा एक सेट उत्पादकाने परत मागवला होता. त्या रंगात शिसे जास्त प्रमाणात आढळले होते. लहान मुले खेळणी चोखतात, जे शक्य असते ते खेळण चावतात, काही चक्क गिळून टाकतात त्यामुळे चांगल्या दुकानातून चांगल्या कंपनीची खेळणी घे हा सल्ला मला पटला होता. मी तो पाळत होते. पण अशा खेळण्याचाही रिकॊल होतो...अनेकदा रिकॊल केलेल्या वस्तू ’मेड इन चायना असतात’. पण अमेरिकन वस्तूंचा रिकॊल होत नाही असे नाही. फक्त जास्त गाजावाजा इतर देशातील उत्पादक असला की होतॊ. याचे उदाहरण म्हणजे टोयोटाची केस.
काही महिन्यांपुर्वी टोयोटा गाडीच्या पार्टचा , काही विशिष्ट गाड्यांचा रिकॊल गाजला होता. जपानमधून अमेरिकेत येऊन या कंपनीच्या सीइओने जाहीर माफी मागितली. त्याचा सगळीकडे गाजावाजा केला गेला. खर इतर कंपनीच्या गाड्यांचा पण नंबर लागला. पण त्यात इतर देशातले उत्पादक जास्त होते. डबघाईला आलेला ऒटॊसेक्टर, बुडीत जाणारी आर्थिक व्यवस्था आणि त्यावेळी परदेशी कंपन्यांचा वाढता शिरकाव याने अमेरिकन जनता ढवळली गेली नाही तरच नवल. किंबहुना आता इतरांचा नंबर लागेल याची खात्रीच होती. पण हे एवढ्यावरच थांबले नाही इतर कंपन्या ज्यात अमेरिकन उत्पादकही होते त्यांनासुद्धा फटका बसलाच.
एका औषधाच्या कंपनीचे औषध परत मागवले की लगेच तिच्या प्रतिस्पर्धी कंपनीचे दुसरे एखादे औषध सदोष कसे आढळते? त्याआधी का मग सर्व चांगले असते? अशा प्रकारात किती स्पर्धा, किती राजकारण किती तथ्य आहे ते नेहमीच समोर येत नाही.
मध्यंतरी भारतीय दुकानातले सर्व मसाले दुकानातून काढून टाकण्यात आले कारण त्यात अनेक दोष आढळले, आरोग्याला घातक घटकांचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त आढळले. ( मला शंका आहे या दुकानदारांनी आपला माल तरीसुद्धा कुठेतरी किमान किमतीला खपवलाच असेल..)
घराघरातून वापरले जाणारे मोट्रीन हे (ब्रुफेन सारखे )एक लहान मुलांचे औषध कंपनीने परत मागवले आहे. त्याच फॆक्टरीत तयार होणारी अनेक औषधे लोक वापरतात. त्यापैकी काहींचा रिकॊल आहेच.
अशा बातम्या वाचल्या, ऐकल्या तर ठीक नाहीतर काय ? माहित नसतांना एखाद्यावर आपत्ती ओढवली आणि बातमी तुमच्यामुळेच तयार झाली तर काय?
नुसता रिकॊल करून हे सर्व संपते का? ज्यांच्या जिवाला हानी झाली ती भरून काढता येत नाहीच. आर्थिक नुकसान होतेच. पण उत्तम प्रतीची वस्तू, उत्कृष्ट प्रतीचा पुरवठा सातत्याने निर्माण होत नाही हा कळीचा मुद्दा आहे. साधारणपणे कला क्षेत्रात एखादा कलावंत सतत उत्तम प्रदर्शन करू शकत नाही तसे तर या पुरवठ्याचे नाही. उत्तम प्रतीचे उत्पादन व्हावे याकरता साचेबंद प्रक्रिया असते. ती आधीच ठरलेली असते, आजमावलेली असते. पण कच्चा माल, उत्पादन पद्धती,बांधणी या सर्वात कशी सूट घेतली जाते?
फायदा हवा असतो पण चटकन आणि कमी गुंतवणूक करून. ही लोभी वृत्ती कधी थांबणार? अशा वृत्तीचा कायमचा रिकॊल कोण करणार?
वस्तूंचा रिकॊल झाला म्हणून प्रश्न संपत नाहीत. पुन्हा असे काही निर्माण होणार नाही आणि जे चुकले आहे ते कसे सुधारता येईल याची हमी कोणाची? परमेश्वरालाही अशा वृत्तीची चुकीची, कमी गुणवत्तेची मॊडेल्स एकदा रिकॊल करता आली आणि नंतर कायमची बंद करता आली तर किती बर होईल!
No comments:
Post a Comment