Monday, March 8, 2010

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे

तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे -ही ग्रेस यांची ओळ मला एका वेगळ्या संदर्भात आठवते.
पुण्यात रहायचो तिथे माझ्या मैत्रिणीचा भाऊ गच्चीवर अभ्यास करायचा. अभ्यास करायचा तर करू देत पण नेमका गाणी लावून अभ्यास करण्याची त्याला सवय होती. त्यामुळे हे साहेब अभ्यासाला बसले की ज्यांना गाणी लावून अभ्यास करता येतो तेवढ्यांनाच अभ्यास करता यायचा. एक दोनदा मैत्रिणीने आणि मी सुद्धा आवाज तरी थोडा कमी कर असे सांगून पाहिले. त्याचा परिणाम अगदी थोडा वेळ टिकायचा ..पुन्हा अभ्यास राहिला बाजूला आणि गाणी सुरु असे असायचे..सुदैवाने त्याच्या आणि माझ्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या होत्या,शिवाय परीक्षा तोंडावर आल्याशिवाय मला अभ्यास सुचायचाही नाही. उद्या सबमिशन की आदल्या रात्री जाग येणार्‍या इंजिनियंरींगचे आम्ही विद्यार्थी... एरवी जगात ज्या काही सुंदर गोष्टी असतात त्याच्यात लक्ष गुंतवायचे, काही नाही तर बोटक्लबवर बसून नदीचे पाणी पहायचे यात धन्यता मानायची एक सवय लागली होती. असो. पण त्यामुळे फार फरक पडायचा नाही. त्यामुळे गाण्याचा त्रास नव्ह्ता हे बरेच. आमचे शेजारी उत्तम शास्त्रीय संगीत गायचे. काका काकू , आजोबा सगळ्यांना संगिताची आवड होती. समज होती. हा मुलगा सुद्धा अपवाद नसावा. पण त्याचे जग वेगळे होते. त्यात तो एम सी एस की एक सीए काय करत होता तेही पुणे युनिवर्सिटीत... मग विचारायलाच नको. इंग्रजीचे भूत शिरले होते अंगात अमेरिकेत जायचे म्हणून तयारी सुरु असायची. सारखा एम टीव्ही आणि इंग्रजी गाणी..

.. अभ्यास प्रोग्रॅमिंग त्याला जमत असावे असे वाटायचे. कायम एक दोन मुली घरी आलेल्या दिसायच्या. एखादी दुसरी त्याच्याबरोबर (कॉलेजात बहुधा) जायची यायची... माझी मैत्रिण भावाची तारीफ करायची. त्याच्या बरोबर आलेल्या मुलींना चहा आणि खायला द्यायची. ( तिला भाऊ पॉकेटमनी देत असावा अशी शंका मला नेहमी यायची. )त्याकाळी मोटरसायकलवर कधीही एकही मुलगी बसलेली नसेल तर मुलाविषयी भलती शंका येत असण्याचा हा काळ होता. त्यात थोडी नवलाई शिल्लक होती. चौकात लाल दिवा असेल तरी आपले इलु इलु चाळे (सॉरी- प्रणयाराधन की काय म्हणतात की काय म्हणतात ते..) चालू असे प्रकार त्यामानाने कमी होते. यातल मी काही करणार नव्हते असे नव्ह्ते,म्हणून जळफळाट होता असे नाही पण योग्य वेळ आणि मुलगा सापडला नव्ह्ता इतकेच.
एक दिवस त्याचा आवाज वाढला होता,रागावारागवी होती आणि बरोबर एकही मुलगी नव्ह्ती.. नंतर कळल की त्याला एका कंपनीत नोकरी मिळाली नव्हती म्हणून त्याची खास लाडकी मैत्रीण(जी आमच्याही ओळखीची झाली होती ती) सोडून- दुसर्‍याबरोबर गेली होती..
इंग्रजी म्युझिक काही काळ बंद झाल होत.. हुश्श..

त्याला एका चांगल्या कंपनीत कालांतराने नोकरी मिळाली होती. नोकरी चांगली असावी पण बरोबर एक चुणचुणीत छोकरी दिसत होती ..नेमाने ..एम टीव्ही सुरु होता पण तो ऐकायच्या त्या सिड्या बदलल्या असाव्या.. आवड बदलली होती का ते कळायला मार्ग नव्हता कारण आजकाल हेड्फोन असायचा त्याच्याजवळ! त्याने आम्हाला गाणी कळत नव्ह्ती ही बोंब होती:) नंतर कळल की ती मुलगी साउथ इंडियन होती आणि त्याला कर्नाटकी / दाक्षिणात्य शास्त्रीय संगीत आवडायला लागले आहे..न आवडून चालल नसतच म्हणा:) जोडीदारासाठी तडजोड करावी लागते, आवडी बदलाव्या लागतात पण प्रत्येक गोष्ट वेगळी असेल तर किती आवडीनिवड बदलणार आणि किती बदलणार? ज्यांना जमत , किंवा तस न करता राहता येत तेच असा प्रेम विवाह करत असावेत. सगळा बॅक्ग्राउंड नॉईज जो आजवर मी ऐकून ऐकू येत नाही असे करायला लागले होते तो अचानक बंद झाला होता. तरी माझा अभ्यास झाला, परीक्षा झाल्या.. डिग्री मिळाली नोकरी लागली.त्या मुलाची त्याच मुलीशी एंगेजमेंट आणि लग्न झाल ,त्यांच विमान अमेरिकेत उतरल...

मला मात्र सहाएक महिन्यात अमेरिकेला जायच अस मनात नसतांना तिथलीच स्थळ येऊ लागली आणि पोटात धस्स व्हायला लागल.सुदैवाने मला लग्नानंतर आवडीनिवडी बदलाव्या लागल्या नाहीत ना नवर्‍याला. मला संगिताचे जेवढ ज्ञान आहे तेवढच त्याला मराठी कवितांच.. त्यामुळे एकमेकांबदल कौतुक आणि आदराने आमचा संसार सुरळीत चालतो. अधून मधून दोघांच्या आवडत्या पिठल्याला खमंग फोडणी दिल्यासारखी भांड्णे होतात ती आवश्यकच असतात असे मी म्हणते,
कधीतरी प्रेम स्थिर झाल्यावर पुन्हा आपल्या सवयी आवडीनिवडी डोक वर काढत असतीलच. तेव्हा काय करायचे? हे विचार लग्नाआधी तर यायचे आणि अजूनही अशा वेळी काय करत असतील प्रेमविवाह करणारे लोक असे विचार मनात येतात.
अशी अनेक जोडपी मी पाहिली आहेत ज्यांच्या आवडीनिवडी भाषा संस्कृती सगळे वेगळे आहे. मुलांनी काय करायचे याची निवड कशी करायची ही एक गंमतच असते. पण संसार त्यावाचून अडत नसावेत. अशा बाबतीत ते समांतर चालत असावेत का? की कुठेतरी काहीतरी कमी असा अर्धा चंद्र त्यांना दिसत असेल? 'तुझ्यात भिनल्यावरी फिरून चंद्र अर्धा उरे असे होत नाही':)

4 comments:

  1. हा हा मस्त लिहिलंय. शेवट तर सहीच !!!

    ReplyDelete
  2. I've started reading your blogs only yesterday - they are all nice - but this is probably the best so far... just when I thought your blogs are a bit too serious! ekdam mast!

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits