आला ऋतू राज वसंत!
थंडीचा कडाका कमी झाला आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाने दिशा उजळल्या आहेत. जागोजागी पडलेला बर्फ आता वितळू लागला आहे. अनेक ठिकाणी दगडावर झरे वाहते झाले आहेत. जमिनीखाली दडलेले ट्युलिप, लिली आणि डॅफोडिल्स वर आली आहेत. झाडांना पालवी फुटलेली दिसते आहे, अनेक फांद्यांवर कळ्या खुलून दिसत आहेत. वसंत आला आहे, नाचत आणि हासत ...चराचराला चैतन्याची पालवी देऊन. एकाकी पडलेली जणू सन्यास घेतलेली झाडे आता परत जगण्याच्या इच्छेने जागी झाली आहेत ती याचीच किमया आहे.
लवकरच चेरी ब्लॉसम फेस्टीवल येईल. फुललेली झाडे सगळ्यांचे लक्ष वेधतील. धरती नटेल, सजेल आणि प्रीतीचा ऋतू येईल - ऋतू राज वसंत!
वसंताने भारलेली ही माझी एक कविता-
पाषाणावर झरा हासरा
मरगळ गेली झाडाची
दिशादिशांना फुटे पालवी
किमया हीच वसंताची
स्वच्छ कोवळे ऊन पाहुनी
सुचते पक्ष्यांना गाणे
श्वास सुखाचे घेवुन आले
फुलून फांदीवर लेणे
नको विरक्ती शिशिराची मज
नको एकट्याने जगणे
श्रॄंगाराने धरती सजली
करता स्पर्श वसंताने
No comments:
Post a Comment