Tuesday, February 16, 2010

आयकार्ली ..

आयकार्ली ..
या एका शब्दाने आमच्या घरात गेले वर्षभर धुमाकूळ घातला आहे. छायागीत, चित्रहार, रामायण महाभारत असे अतिशय थोडे कार्यक्रम बघण्याची परवानगी लहानपणी मला होती. अमेरिकेत सहा वर्षे पिबिएस किड्स वरची मुलांना बघण्यायोग्य सिरियल्स एवढेच आमच्याकडचे टिव्ही विश्व होते.पंचतंत्र, इसापनिती, रामायण, कृष्ण इत्यादीची ओळख मी गोष्टीतून , गाण्यातून करून देत होते. पण मैत्रिणींकडे खेळायला गेली असता ही आयकार्ली मुलीला दिसली आणि अखेर आमच्या घरात शिरली...

साधारण सात आठ वर्षाची मुलगी ज्या घरात आहे त्यांना याविषयी काहीच सांगायची गरज नाही. या वयाच्या भारतातल्या मुलीसुद्धा आता हॅना मॉन्टाना बघतात कदाचित निकलोडियनवर आयकार्ली दिसत असले तर बघत असतील यात शंका नाही. मुलीला हा कार्यक्रम बघायचा म्हणून तिची धडपड आणि तिने तो बघू नये म्हणून माझी घालमेल... माझ्या तू जर अमूक केले तर तुला हा प्रोग्रॅम पाहू देईन या वाक्याने कधी नव्हे तर इफेक्ट दाखवला होता त्यामुळे माझा नाईलाज झाला होता.

आयकार्ली बघतांना प्रत्येकाला मनात कोपर्‍यात लपवून ठेवलेल्या अनेक आठवांचा सुगंध नकळत येईल. ते लहानपणचे दिवस आता येणार नाहीत हेच खरे.. लहान असतांना गेलेल्या गमती आठवतील त्याबरोबर बदतल्या जगाने मुलांचे विश्व खरच एवढे बदलले आहे का असा विचारही मनात येईल.

पूर्वी जे शिंगे फुटणे प्रकार सातवी आठवीत व्हायचा ते आता लवकरच होते आहे. शारीरक बदल झाले नसले तरी मिळणार्‍या एक्स्पोजरने, एकंदर बदलत्या राहणीमानाने सात आठ वर्षाची मुले आधीच नको तेवढे शहाणी झाल्यासारखे वागत असतात. अशाच अतिशहाण्या पण हुशार आणि चमकदार मुलांची गोष्ट आहे आयकार्ली. आमचे चिंटू चिंगी, फास्टर फेणे अजूनही त्याच वयाचे आहेत. प्रकाश संत, दिलीप प्रभावळकर यांच्या लेखनातील हिरो लंपन आणि बोक्या सातबंडे नक्की बदलत्या वातावरणातले आहेत. अमेरिकेत टेलेटबीज, बारनी आहे त्याच वयाचे राहिले पण आता नविन हिरो वयाने वाढत असतात, मुलांना ते जास्त जवळचे वाटतात.खरे वाटतात. म्हणूनच सर्वसाधारणपणे आता हे मुलांचे आदर्श गोष्टीमधून वयाने खरच मोठे होत जातात असे दाखवले जाते.

पौगंडावस्थेतल्या मुलामुलींना त्यांच्या वयाचे किंवा वयाने थोडे मोठे अनुकरण करता येतील असे मित्र मैत्रिणी हवे असतात , ती मुले कसे वागतात त्याचा आरसा म्हणजे आयकार्ली आहे. अमेरिकन आयुष्य, इथले जीवन, समाज या सर्वाना मुलामुलीची प्रतिक्रीया कशी असते याचे चित्र , याचे गुपित आयकार्लीला सापडले आहे. तीन मित्रांनी सुरु केलेल्या वेब शोवर ही मालिका बेतलेली आहे.
माझ्या लेखनाने कोणी अमूक एक शो बघावा असे उद्देश मु़ळीच नाही, काय बघायचे आणि नाही या प्रत्येकाचा निर्णय आहे. मुलांना आवडणारा आयकार्ली हाच एक शो नाही अनेक आहेत, मी हा एक उदाहरण म्हणून घेतला. आईवडील वाचतात ती मासिके चोरून वाचणे, मित्रमैत्रिणींबरोबर सिनेमाला जाणे, एखादे लेक्चर बंक करणे अशा खोड्या काढत मोठे होणे ही एका वयाची मजा असते. ते वय पुन्हा येत नाही. पण फार मजा झाली तर आयुष्य एक सजा व्हायला वेळ लागत नाही हे शहाणपण आईबाप झाले की येते आणि सुरु होतो तो रोल रिव्हरसल..
तुमच्या आईवडिलांची जागा तुम्ही घेता.. तुमच्या जागी असतात तुमची मुले!
हातात छडी घेतलेले मास्तर आता दिसत नाही तसेच शिस्तीचा बडगा हातात घेणारे आईवडिलही .. पण शिस्त सोडताही येत नाही हे त्या मुलांना पटवणे यात खरी कसोटी असते. प्रत्येक पिढीच्या समस्या वेगळ्या होत्या आणि राहतीलही. त्याचा आरसा कुणी दाखवत असेल तर बघायला काय हरकत आहे? रिमोट कंट्रोल हातात घेऊन अशा कार्यक्रमाचे काही ठराविक भाग मुलांना दाखवायचे, अनुभवाची देवाणघेवाण करायची, मुलांना समजून घ्यायचे की स्वतःच्या कोषात राहायचे हे पालकांनी ठरवायचे आहे.

No comments:

Post a Comment

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits