Thursday, February 18, 2010

फेसबुक, ट्विटर , गुगल बझ सग़ळ्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?



फेसबुक, ट्विटर , गुगल बझ सग़ळ्याचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
फेसबुक, ट्विटर , गुगल बझ, ऑर्कुट इथे सगळीकडे मित्रमैत्रिणींशी , अनोळखी व्यक्तींशी बोलूनही तुम्हाला हवे ते मिळत नाही असे झाले आहे का? या सर्वांचा कंटाळा येतो का? नवे काही हवे अशी तुमची स्थिती आहे का?
असे असेल तर त्यात काही नवल नाही. रोज रोज तेच ते करून कुणाला कंटाळा येणार नाही? मग मी काय टेक अ ब्रेक असे सांगते आहे का? तुमच्या असे मनात आले असेल ना? अह .. मी आणखी काही नवीन शोधा असे सांगते आहे. शेवटी तुमचा उद्देश काय ते महत्त्वाचा. चार जणांशी शिळोप्याच्या, उगीच उडत उडत हवापाण्याच्या गप्पा करायच्या आहेत, काही गॉसिप करायच आहे, की चक्क जरा गुलाबी सोबत शोधायची आहे ते मनात पक्क करा आधी. तस ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नसतोच याचा अनुभव असेलच.


तशी ८०% जास्त मराठमोळी चॅट कॉनवरसेशन्स एकमेकांना तेच ते प्रश्न विचारणारी असतात. इतर भाषेतही काही स्थिती फार वेगळी नसावी. अनोळखी व्यक्तीशी बोलतांना तिच्या/ त्याच्या किती लवकर, किती जवळ तुम्ही तिला / त्याला येऊ देता किंवा जाऊ शकता यातच तर सगळ आहे. तेव्हा स्वतःभोवती चौकट आखून वावरायच की बेधडक ,बिनधास्त वागायच हा तुमचा निर्णय! नाहीतर
एकः काय चाललय?
दोनः तेच तेच नेहमीच
एकः आजचा काय बेत?
दोनः बेत काय तेच आपल
एकः च्यायला माझ पण असच चालू आहे. जाम वैताग, ते क्रिकेटची मॅच पाहिली का?
दोन : मरू दे , हारणार, दुसर काय?
..........................
अशा अनेक चॅटपैकी आपलीही एक चॅट अजून काय...
अगदी गुलाबी चॅट रुममध्ये जाऊन किती जणांना हवे ते मिळते? ऑनलाईन मॅचमेकिंग , डेटींग सगळे प्रकार करूनही हवे ते मिळत नाही अशी स्थिती असते. कारण चॅटरूम काही कामाच्या नाहीत! बरोबर!
आपल्याला नक्की काय हवे ते कळत नाही हा खरा प्रश्न आहे. कोणाशीतरी संवाद करणे, तोही वरवरचा हा त्यावरचा शोधलेला तात्पुरता उपाय आहे.

जिथे माणसाला प्रत्यक्ष भेटून, एकमेकांबरोबर राहून माणसे कळत नाहीत तिथे नुसते बोलून काय होईल?
एकमेकाची माहिती , प्रत्येकाचा स्वार्थ, मुखवटा, खरेखोटे कशाचाच अंदाज देता येत नाही असे हे मायाजाल. तरी या जाळ्याचा आवाका फार मोठा आहे हेही सत्य आहे.

कोणतीही गोष्ट एकदा मि़ळाली की त्याचे नाविन्य सरते आणि त्याकडे बघायचे दृष्टी पर्यायाने बदलू शकते. काही गोष्टी फार सवयीच्या होतात, व्यसन लागते हा सुद्धा त्याकडे बघायचा बदलचः)
अगदी प्रेमी किम्वा नवराबायको सुद्धा जन्मभर एकमेकांना फक्त इलू इलू करू शकत नाही. प्रत्येकाचे आयुष्य समस्यांशिवाय असू शकत नाही. प्रत्येकजण आयुष्यात कायम यशस्वी होऊ शकत नाही. पण दुसर्‍याच्या घरात डोकावेसे वाटतेच ना?
त्यापलिकडे दुसर्‍याशी तुलना करणे ही माणसाची एक बेसिक गरज आहे की काय असे म्हणावेसे वाटते आहे. तू किती खोलात , मी किती खोलात ,अशी सारखी एकमेकांची चाचपणी , हारजीत, खिजवणे ही अनेकांची वृत्ती. त्याला या चॅटींगमधे वाट करून देता येते का? ह्म्म. आपल्या आयुष्यातल्या गोष्टी काय कमी होतात २४ तासात म्हणून दुसर्‍याच्या आयुष्यात काय चालू आहे ते जाणून घ्यायची एक विलक्षण न ताबा ठेवता येणारी गरज माणसाला असते - यात या सगळ्या संवादाचे, चॅटींगचे शक्तीस्थळ आहे.
वेगळी भाषा, वेगळी माणसे, वेगळे नाव सगळे प्रयोग करून बघा.. www.chatRoulette.com ही एक अशीच नविन साईट आहे. डोकावून बघितले तरी इतर चॅटरूम पेक्षा काही वेगळे दिसणार नाही.
कोणी कोणाचा मित्र असण्याची गरज नाही, खुलेआम पहा काय चालू आहे ते..असे घोषवाक्य दिसते म्हणून पालकांच्या डोक्याचा भुगा झाला आहे, काही लोक खुषीत आहेत, काही व्यवसाय म्हणून त्यात नफा शोधत आहेत.. असे काही नसावे, तसे नसावे, वयाची अट असावी इत्यादी इत्यादी...सगळे कसे नेहमीचे, रुटीन..मास्कोमधला एक सतरा वर्षाचा मुलगा याचा निर्माता आहे.. अनेक ब्लॉग सध्या या साईटबद्दल लिहित आहेत मोठ्या उत्साहाने... ( मी तटस्थ आहे असे वाटले मला.. किंवा या सर्वाच्या विरोधातही?)
काही हजारावरून लवकरच संख्या वाढली तरी या जा़ळेसुद्धा लवकरच गुंडाळले जाईल असे वाटते आहे.शेवटी खरा प्रोब्लेम चॅटरुमचा नाही , समाजव्यवस्थेचा आहे, लोकांचा आहे,आपला आहे..










3 comments:

  1. छान पोस्ट आहे !
    - निनाद गायकवाड

    ReplyDelete
  2. व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे.
    या जगात काही लोकांना समोरासमोर भावना व्यक्त करता येत नाहीत. त्यांच्या साठी या माध्यमांचे विषेश महत्व आहे.

    ReplyDelete
  3. ह्म्म्म..... आजकाल सारेच जालावर अशी काहिशी परिस्थिती झालीये खरी. शेवटी संवाद होणे-भावना पोचणे महत्वाचे आहे.पोस्ट चांगली आहे.

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits