Tuesday, February 23, 2010

ताइ शान - परत ये.. आम्हाला तुझी खूप आठवण येते.!

ताइ शान - परत ये.. आम्हाला तुझी खूप आठवण येते.!

प्रत्येक जेवणात मांसाहार नसेल तर ते कसले जेवण आणि मांसाहार घ्यायचा नाही तर खायच काय अशी संकल्पना असणारे अनेक अमेरिकन मला भेटले आहेत. दर जेवणाला एक प्राणी मारला जातो हे एक वास्तव असले तरी कुत्रा मांजर , मासे , हॅमस्टर असे विविध पाळीव प्राणी, झू मधले प्राणी, मानशेष होणारे प्राणी या सर्वांचा विषय निघाला की ह्याच लोकांचे प्राणीप्रेम उफाळून आलेले मी बघितले आहे. या दोघांची सांगड कशी घालायची ते मला कधीच कळलेले नाही. त्यामुळे अमेरिकन लोक आणि त्यांचे पशुंवरचे प्रेम मला कुठेही दिसले तरी माझे कुतुहल चाळवले जाते. अमेरिकनांच्या अशाच प्रेमाची एक घटना जानेवारीत चर्चेत होती ती म्हणजे झूमधला एक लाडका पांडा चीनमध्ये परत जाणार ही! गेल्या वर्षात आमच्या सुद्धा १० फेर्‍या झूला झाल्या होत्या. तेव्हा माझ्या मुलांनी प्रत्येक वेळी पांडा बघितला होता. फोटो काढले होते. त्यामधला ताइ शान कोणता ते मला तरी सांगता येणार नाही ही गोष्ट वेगळी. पण लाडका ताइ शान परत जाणार ही मोठी दु:खद घटना मानायला पाहिजे यात शंकाच नाही...


From ब्लॉगर चित्रे

अमेरिकेच्या नॅशनल झू मधला लाडका पांडा ताई शान ठरल्याप्रमाणे चीनमध्ये परत जाणार हे कळल्यावर अनेक चाह्त्यांनी त्याला भेट दिली, पत्रे लिहिली , फोटो काढले.. वर्तमानपत्रातून/ रेडिओ, टिव्ही सगळीकडे त्याच्या प्रवासाची तयारी, प्रवास , चीनमध्ये स्वागत कसे होणार इत्यादी माहिती येत होती. अमेरिकेत 'हिरोचे स्टॅटस' असलेला हा पांडा जरी पांडाच्या प्रजननाच्या मदतीला जात असला तरीसुद्धा कदाचित तो चीनमध्ये एक सामान्य आयुष्य जगेल अशी शंका व्यक्त होती.

वॉशिंग्टन पोस्ट मधे जवळजवळ रोजच सगळ्या घडामोडी कळत होत्या, मुलांनी काढलेली ताइ शान ची चित्रे, त्याचे फोटो येत होते. अखेर जाण्याचा दिवस उगवला, ताइ शान विमानात बसला..
वॉशिंगटन नॅशनल झूमध्ये त्याची देखरेख करणारे , त्याचे चाहते अशा सर्वाचा निरोप घेऊन ताइ शान ने चीनचा प्रवास सुरु केला. खास विमानाने तो चीनकडे रवाना झाला, त्याने विमानात काय केले ? तर नेहमीप्रमाणे तो बांबू खात होता! त्याने किती बांबू फस्त केले, किती पेअर्स , किती सफरचंदांचा फन्ना उडवला याची आकडेवारी सुद्धा त्याचे चाहते कौतुकाने लक्षात ठेवत होते.

अनेक चाहत्यांनी तो किती लाडका होता याचे वर्णन केले, किती जवळचा होता यावर बोलतांना त्यांचा आवाज भरून आला होता. माझ्या मुलावरसुद्धा मी जेवढे प्रेम केले नाही तेवढे मी या पांडावर केले असे उद्धार एखादीने काढले असतील तरी मला नवल वाटणार नाही एवढा हा पांडा सगळ्यांच्या गळ्यातला ताईत आहे याचा अनुभव नॅशनल झू मधे जाताच येत असे.

पण चीनमध्ये आल्यानंतर लगेचच ताई शानला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मिळाली आहे; ती मिळवण्याकरता अनेक खेळाडू अनेक मान्यवर यांना जे आयुष्यात शक्य होत नाही ते यश ताइ शानने एका आठवड्यात मिळवले आहे.. तेव्हा आता त्याची तिथे आबाळ वगैरे होणार नाही हे नक्की.. आयुष्यभराच्या व्यवस्थेच्या बदल्यात त्याचे खूप हाल होणार नाहीत याची काळजी सुद्धा घेतली जाईलच. ताइ शानच्या चाहत्यांना हे वाचून आनंदच झाला असेल ..त्याची जन्मभराची खाण्यापिण्याची व्यवस्था मिटली आहे, ज्या उद्देशाने तो चीनमधे गेला आहे तो सुद्धा सफल होवो म्हणजे झाले...ज्युनियर ताइ शान अमेरिकत आला तर अशी चर्चा सुद्धा पांडाप्रेमी करत असतीलच..ताइ शान आता कामाला लाग बुवा..
From ब्लॉगर चित्रे




1 comment:

  1. सोनाली,एखाद्या गोष्टीचा किती उदोउदो करायचा हे यांच्याकडून शिकावे. बाकी ताई शान ची मात्र मज्जा झाली. असेही मुलांपेक्षा जास्त लाड पेटसचे.:) चला आता दिल्या घरी सुखी राहण्याचीही सोय झालीये. पोस्ट मस्त.

    ReplyDelete

RSS Subscribe

हा ब्लॉग या ठिकाणाहून बघितला गेला

इंडिब्लॉगर

visits